मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

बुधवार, 18 सितंबर 2024

Dharm & Darshan !! A heart touching story !! ( Marathi)

 शेवटी संस्काराने मात केली ....

  

अगदी जड अंतःकरणाने अविनाशने कारच्या डिक्कीचा दरवाजा उघडला, आईची बॅग आत सरकवली, दरवाजा बंद केला, दरवाज्याच्या काचेवर ठळक "आईची पुण्याई" लिहलेल्या अक्षराकडे पाहून त्याचे डोळे पाणावले! कारचा दरवाजा उघडला, आई आत बसली अन गाडी निघाली.


दोघेही शांत होते !...


बाबा गेल्यावर सर्व घराची धुरा सांभाळत आईबाबा दोघांची जबाबदारी आपल्या सर्व आशा आकांक्षा बाजूला गुंडाळून आईने प्रचंड ताकतीने पेलवली होती! बाबानंतर बाबांच्या पेन्शनच्या पैशातून त्यांच्या स्वप्नातील त्यांचे घर चालवत एकुलत्या एक अविचे उच्चशिक्षण, एका नामांकित कंपनीत मोठ्या पॅकेज ची नौकरी, उच्च विद्याविभूषित संस्कारी घरातील मुलीशी विवाह, एक गोंडस आजीच्या छत्रछायेत वाढलेली संस्कारी कन्यारत्न अन गेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी अविच्या स्वप्नातली त्याला घेऊन दिलेली ही कार ! सर्व अविच्या जमेची बाजू होती !

सातव्या महिन्यात जन्मलेली 'मनू' कदाचित वाचणार नाही असे डॉक्टरने सांगितल्यावर सर्व देव पाण्यात टाकून, बाबांचे वर्षश्राद्ध न करता सतत वीस दिवस आई दवाखान्यातून हलली सुद्धा नव्हती ! मनू आज दहा वर्षाची झाली तरी आईपेक्षा आजीच्या सानिध्यात राहूनच तिने *'उत्तम संस्कार'* आत्मसात केले होते, त्याचा परिणाम पण असा होता की शाळेच्या पालक सभेत जाणे अन मनूची प्रशंसा ऐकून घरी परत येणे! याशिवाय अवि अन उच्चविद्याविभूषित पत्नी 'जयंती' कडे पर्याय नव्हता !

सर्वकाही ठीकठाक चालले होते !


आई आईचे सर्व काम स्वतःच करत होती ! आजपर्यंत आईने अविकडे एक रुपया देखील मागितला नव्हता ! नियमित चालणे, धार्मिक ग्रंथाचे वाचन, न चुकणारा हरिपाठ यामुळे तिला दवाखाना माहीत नव्हता !

पण सर्वच सुखात चालले तर दुःखाने कोणाच्या खांद्यावर डोके टेकायचे ..????


उच्चविद्याविभूषित संस्कारी घरातील सून आणण्याचा आईचा निर्णय कदाचित चुकला होता ! सुंदर, सालस, संस्कारी, गर्भश्रीमंत होती पण माणसाला माणूस अन प्राण्याला प्राणी समजण्याची कला तिला अवगत नव्हती !

छोट्या छोट्या गोष्टींमुळे, मैत्रिणींच्या सल्ल्यामुळे, माहेरच्या गुजगोष्टीमुळे तिने गेल्या तीन महिन्यापासून अविचे अक्षरशः डोके खाल्ले होते, अन गेल्या पंधरा दिवसापासून अविशी अबोला केला होता !


विपन्नावस्थेत असलेला अवि प्रचंड मानसिक दबावाखाली जगत होता, त्याच्या मनात अस्तित्व निर्माण करणारी जननी विरुद्ध जन्मजन्मांतरी साथ देणारी(?) पत्नी यांचे पारंपरिक युद्ध तो प्रत्यक्षात अनुभवत होता !

याचा पूर्णविराम त्याला हवा होता.


आईला कळू न देता त्याने एका वृद्धाश्रमाची माहिती तो काढून आला होता ! अन आज आईने घेऊन दिलेल्या कारमध्ये तो आईला बसवून त्या वृद्धाश्रमात सोडण्यासाठी निघाला होता अन ते पण आईला याची पूर्वकल्पना न देता !! त्याच्यासाठी हा दैवदुर्विलास !!

गाडी गल्लीतून मुख्य रस्त्याला लागली, ताकतीने पळण्याची क्षमता असूनही गाडी फारच कमकुवत मनाचा चालक बसल्यामुळे अगदी चालकाच्या सोयीप्रमाणे चालत होती ! आईने पॉकेट ज्ञानेश्वरी काढली अन वाचत बसली !

आईने अविला एका शब्दाने विचारले नव्हते की तो तिला कुठे घेऊन जात आहे ! कदाचित तिला कळले तर नसेल ?? त्याच्या मनात एक संघर्ष पेटला होता, आयुष्य घडवणारी आई का आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देणारी पत्नी ??

पण आई माझ्या भावना समजावून घेईल अन माझ्या निर्णयाला नेहमीप्रमाणे समर्थन देईल या भावनेतून त्याने आईला न सांगता हे पाऊल उचलले होते ! पण आईला प्रत्यक्ष बोलण्याची हिम्मत त्याच्यात अजिबात नव्हती !!

काय सांगू ? कसे सांगू ? या विचारात गेल्या नव्वद दिवसापासून होता तो !!


यएखाद्या मालिकेमध्ये एकाच भागात संपणारा विषय तीन महिने घोळावा अन त्यातून काहीतरी अनपेक्षित बाहेर यावे तसाच हा विषय होता !! समोरील चौकातून गाडी डावीकडे वळली, महिन्याच्या वारीसाठी एकादशीला नाथमहाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या आईचा अगदी पाठ झालेला रस्ता असल्याने आईने त्या रस्त्याचे दर्शन घेतले.

हळव्या मनाच्या अविच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते, सतत गालावर ओघळत होते.


गाडी वृद्धाश्रमच्या दिशेने चालत होती, अविच्या मनातला संघर्ष तीव्र होत होता ! जगण्याची कला ज्या गुरूंनी शिकवली होती त्याला, त्यांना तो अखेरचा श्वास कुठे घ्यावा हे शिकवायला निघाला होता !! त्याच्या माथी आज भयंकर संकट धर्मयुध्दाच्या रूपाने उभे होते ! कोणत्याही परिस्थितीत अपयश त्याच्याच पदरी पडणार होते !!

अत्यंत रहदारीचा रस्ता असल्याने त्याची नजर फक्त समोर होती, दुरवर एक रसवंती दिसली. रसवंतीवर थांबून मन मोकळे करावे असा विचार त्याच्या मनात आला. सर्व आईला सांगून मोकळे व्हावे, आई जे म्हणेल त्याला सामोरे जावे असा विचार त्याने केला ! गाडी थांबली !


वेड्यावाकड्या लाकडावर उभ्या केलेल्या चार पत्राच्या शेडमध्ये एक चरक उभे केले होते. चरकाच्या वर विठ्ठलाचा फोटो अन त्याच्या शेजारी एका तरुणाचा हार घातलेला फोटो होता! एक आजीबाई चरकातून ऊस ढकलण्यात अन चरकासमोर उभी राहून पिळून निघालेला ऊस आजीबाईंच्या हातात पुन्हा देण्यात एक तरुण स्त्री मग्न होती, उसाचा शेवटचा थेंब आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची धडपड वाखाणण्याजोगी होती ! एका इंग्रजी शाळेच्या गणवेशातील नऊ दहा वर्षाची पोर टेबलवर पिण्याचे पाणी ठेवत हाफ का फुल ? गोड आवाजात विचारत होती.

अंगठा अन तर्जनी ताणून दाखवत अविने तिला फुल्ल रस पाहिजे असा इशारा केला, ती चरकाकडे वळाली. रस आणून ठेवला.

"नाव काय गं तुझं ?" कुतूहलाने आईने त्या मुलीला विचारले.

"माय नेम ईज 'भागीरथी' " सांगत ती आपल्या कामात व्यस्त झाली.

आईने रस पिऊन संपवला, अविने अजून ग्लासला हात लावला नव्हता.

अवि विचारात मग्न होता अन आई निरखून त्या तरुणाच्या फोटोकडे पहात होती ! चरक बंद झाला होता, आईचे निरीक्षण करणाऱ्या आजीबाई आईच्या बाजूला बसत बोलली, "ल्योक हाय माझा ! डायव्हर हुता ! आक्सिजंट मधी गेला ! आम्हास्नी रस्त्यावर टाकून !"

तिचे डोळे पाणावले होते ! आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिचे पण डोळे पाणावले !

गिऱ्हाईक आल्याने आजीबाई उठली, अवि सर्व पहात होता.

अवि दहा वर्षाचा असतांना त्याचे बाबा गेले पण त्याच्या संगोपणात कसलीच कमतरता येऊ न देता त्याला आज समाजात ताठ मानेने फिरवणारी त्याची आई होती ! या कुटुंबावर आज जी वेळ आली तशी त्याच्या आईवर आली असती तर ?? किंवा भविष्यात जयंती अन मनू वर अशी वेळ आली तर ??? या विचाराने अवि अगदी कोमात गेल्यासारखा बसला होता !


"अवि रस घे ना रे बेटा !" आईच्या शब्दाने तो खडबडून जागा झाल्यासारखा "हो आई!" बोलून एका घोटात रस संपवत ग्लास खाली ठेवला.

बिल देत दोघेही गाडीत बसले ! गाडी निघाली !

.

तीकडे......

.

जातांना म्हातारीने कसली कळकट पर्स ठेवली म्हणून उत्सुकतेने जयंतीचे ती उघडली, तिच्या नावे केलेली पंधरा लाखाची एफ.डी. अन मनूच्या नावे केलेली दहा लाखाची एफ. डी. व आईचे काही जुने दागिने होते त्यात ! जयंतीचे डोळे विस्फारले, त्यात आपोआप पाणी आले, ती ढसाढसा रडत होती, स्वतःच्या मुलाच्या नावे एक रुपयाही न टाकता सून अन नातीच्या नावे आपली सर्व पेन्शन समर्पित करणारी सासूच्या रुपात लाभलेल्या आईला तिने काही क्षणापूर्वी घरातून काढले होते ! आज ती स्वतःच्याच नजरेत अपराधी झाली होती  !!

.

.

.

तिने फोन उचलला..अविला लावला...

फोन वाजला, जयंतीचा होता, उचलला नाही, पुन्हा आला, उचलला नाही, पुन्हा वाजला, पुन्हा उचलला नाही !

काय झाले? किंवा काय केले ? यासाठीच फोन असणार याची त्याला कल्पना होती ...!!!!

त्याच्या डोळ्यासमोर चरकाची दोन चाके स्पष्ट दिसत होती, एक आई अन दुसरी जयंती, मध्ये पिळून निघणारा ऊस त्याला त्याचे अस्तित्व भासत होता, या सर्व प्रक्रियेत त्याचा पालापाचोळा होणे त्याला अटळ वाटत होते !

एका पारंपरिक प्रथेत त्याचा बळी जाणार हे शाश्वत होते !

समोर वृद्धाश्रमाची पाटी दिसली ! अविचे अंग थरारले ! आईच्या पदरातून बाहेर पडण्याची कला त्याला अवगत नव्हती, त्याने गाडीची गती वाढवली, अगदी पाटी आईला अस्पष्ट दिसेल एवढी !


वृद्धाश्रम मागे पडले ! पण पुढे जायचे कुठे ??

अगदी थोड्या अंतरावर मंदिराजवळ गर्दी दिली, समोर लावलेल्या बॅनर वरून नव्याने निर्माण झालेल्या साईबाबांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होती असा संबोध होत होता, गाडी तिकडे आपोआप वळली !

आईच्या चेहऱ्यावर आंनद दिसला, तो पाहून अविच्या मनालाही आनंद झाला !


आई कार्यक्रमात व्यग्र झाली, आईला वृद्धाश्रमात न सोडण्याचा निर्णय त्याच्या संवेदनशील मनाने घेतला होता ! काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण शेवटच्या श्वासापर्यंत आई माझे अस्तित्व बनून राहील ! असा ठाम निर्णय त्याने घेतला होता !!


आपण आईला कोणत्या कारणाने आणले हे आईला कळले नाही याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

कार्यक्रम संपला ! आतापर्यत जयंतीचे जवळपास तीस कॉल त्याने 'मिस' केले होते, 'आईला सोडा, लवकर या ! याशिवाय ती काय बोलणार ?' म्हणून त्याने तिचे कॉल रिसिव्ह केले नव्हते !

आई अगदी तृप्त मनाने अन आनंदी चेहऱ्याने देवळाच्या पायऱ्या उतरतांना दिसली, अवि लगबगीने तिच्या जवळ गेला, दर्शन घेतले, तिच्या हातातील प्रसादाची वाटी घेऊन गाडीपर्यंत येऊन आईला गाडीत बसवले.

एक नवी ऊर्जा नवा जोश संचारल्यागत तो वेगाने गाडी घराच्या दिशेने पळवत होता !

गाडी दारात येऊन थांबली ! जयंती पळत आली अन गाडीतून उतरण्याच्या तयारीत असलेल्या आईला अक्षरशः ओढत तिच्या गळा पडून रडत होती ! रडत रडत फोन का उचलत नाही म्हणून अविला भांडत होती !


अविसाठी हे चमत्कारापेक्षा तीळभर सुद्धा कमी नव्हते !!

सहा वाजले तरी मनू शाळेतून आली नाही म्हणून जयंती चिंतीत पण होती !अविने व्हॅनच्या चालकाला फोन लावला, त्याने सांगितले की मनू ला घरासमोर सोडले !!

आता अवीची अन जयंतीची चिंता खरोखरच वाढली !

आईने दोघांना मागे येण्याचा इशारा केला अन पुढे चालत जवळच असलेल्या गेल्या वीस वर्षांपासून दररोज न चुकता हरिपाठ साठी जाणाऱ्या मंदिरात घेऊन गेली ! अवि अन जयंती पहिल्यांदाच मंदिराच्या आवारात प्रवेश करीत होते !

हरिपाठ, आरती आटोपली होती, मनू सर्व आजींना आपल्या खाऊसाठी दिलेल्या पैशातून प्रसाद म्हणून 'खडीसाखर' वाटत होती !!

आजीला बाहेर पाहून ती पळत येत तिला बिलगली, "आजी आज आपला प्रसादाचा वार होता ना, तू नव्हती म्हणून मी आले ! माझं काही चुकलं का ?" मनू

"माझा वाघाचं काही चुकतं का ??" दप्तरासगट तिला उचलून घेत आई बोलली !

तिच्या बालमनावर झालेले पवित्र संस्कार! अन आपल्या मनावर राग,लोभ,मद, मत्सर,अहंकार अन पैशाच्या मस्तीने केलेले व्यभिचार याच्या तुलनेत अवि अन जयंतीची मने खजील झाली होती !!


 तात्पर्य: संस्कार सर्वश्रेष्टच असतात.


 रडू नका,जर डोळ्यातून आपोआप पाणी आलेच तर समझा कि आपण हि संस्कारी आहातच।

Saujanya सौजन्य 



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Deepaavali !!

 दीपावली में लक्ष्मी और गणेश की पूजा का रहस्य! प्रायः लोगों के मन में प्रश्न उठता की दीपावली में बजाय लक्ष्मी और नारायण के युगल पूजा के गणेश...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!