मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

शुक्रवार, 12 जून 2026

Dharm & Darshan !! Marathi Inspiring Story !!

 *'लायकी' दाखवण्याचे दिवस*

पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती. रस्त्यावरून अचानक एक खणखणीत आवाज आला,

“गवार वीस रुपये… 

कलिंगडं शंभरला तीन…!”

डोळे चोळत गॅलरीत आलो. खाली सोसायटीच्या गेटजवळ तेरा-चौदा वर्षांचा एक मुलगा हातगाडी घेऊन उभा होता. कपाळावर घाम, चेहऱ्यावर थकवा, पण आवाज मात्र दमदार. वॉचमन त्याला थोडं लांब उभं राहायला सांगत होता. मुलगा हात जोडून म्हणत होता, “थोडा वेळ थांबू दे ना काका”

मी वरूनच त्याला थांबायला सांगितलं. खाली गेलो तर काही बायका-पुरुष आधीच जमले होते. सगळे सोशल डिस्टन्सिंग ठेवून भाजी घेऊ लागलो.

इतक्यात तो मुलगा एका दादाला हळू आवाजात म्हणाला,

“दादा… तांब्याभर पाणी मिळेल का?”

दादाने तोंड वाकडं करत उत्तर दिलं,

“समोर चौकात टाकी आहे. तिथं जाऊन पिऊन ये. एवढ्या सकाळी तहान कशी लागली तुला?”

मुलगा शांतपणे म्हणाला, “साहेब, पहाटे पाचला घरातून निघालो. सात किलोमीटर चालत आलोय, बाटलीतलं पाणी संपलं.”

हे ऐकूनही कोणाच्या चेहऱ्यावर दया दिसली नाही. एक ताई तर लगेच म्हणाली, “अरे आम्ही तुला पाणी देणार आणि तुला कोरोना असेल तर? मग आम्हालाच लागेल ना!”

मुलगा काही बोलला नाही. फक्त आवंढा गिळून शांत उभा राहिला.

आम्ही स्वतःला सुशिक्षित, उच्चभ्रू समजणारी माणसं, पण त्या तहानलेल्या मुलाला पाण्याचा एक घोट देण्याची माणुसकी मात्र कुणाकडे नव्हती. मनात कुठेतरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भावना दिसत होती,

“आज याला दिलं तर उद्या वॉचमन मागेल, परवा कचरा उचलणारी बाई मागेल”

इतक्यात एक स्कॉर्पिओ येऊन थांबली. त्यातून दाढी मिशीवाला एक रांगडा माणूस उतरला. त्याच्या हातात एक पिशवी होती. तो शांतपणे आला, ती पिशवी मुलाच्या हातगाडीवर ठेवली आणि म्हणाला, “उन्हाच्या आत घरी ये रे भैय्या.”

तो माणूस परत गाडीत बसला आणि निघून गेला.

आमच्यातल्या एका दादाने हसत विचारलं, “त्यांच्याकडे कामाला आहेस का तू?”

मुलाने पिशवीतून पाण्याची बाटली काढली. आधी चेहऱ्यावर पाणी मारलं, मग चार घोट पिऊन शांतपणे म्हणाला, “वडील होते माझे.”

क्षणभर सगळे शांत…

तरीही कुणीतरी प्रश्न विचारलाच, “मग घरी स्कॉर्पिओ असताना तू हातगाडीवर भाजी का विकतोस?”

मुलगा गवार तोलत म्हणाला, “घरी एक नाही, चार गाड्या आहेत ताई. तेवीस एकर बागायत आहे. पुण्यात मार्केटयार्डात तीन गाळे आहेत. पण तात्या म्हणतात,

लोकांची खरी नियत समजून घ्यायची असेल तर साध्या माणसासारखं जगून बघ.

आजच्या काळात गरीब माणसांशी लोक कसं वागतात ते पाहणं गरजेचं आहे.  उद्या सगळा धंदा मलाच सांभाळायचा आहे. रोज दोन-अडीच लाखांचा 

माल फिरतो, त्यासाठी लोकांची लायकी ओळखायला शिकायला हवं.”

त्याचं वाक्य संपलं, आणि आम्ही सगळे 

न बोलता पैसे देऊन आपापल्या फ्लॅटमध्ये निघून गेलो.

गॅलरीतून मी त्याला जाताना पाहत होतो. तो पुढे निघाला होता, आमची लायकी दाखवून, पुढच्या कुणाची लायकी पाहायला,

कधी कधी संपत्तीपेक्षा माणुसकी मोठी असते, आणि तीच खरी ओळख ठरते.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharm & Darshan !! Marathi Inspiring Story !!

 *'लायकी' दाखवण्याचे दिवस* पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती. रस्त्यावरून अचानक एक खणखणीत आवाज आला, “गवार वीस रुपये…  कलिंगडं शंभरला तीन...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!