तिबेटमधल्या एका गुरूच्या शिष्याने गुरूंच्याच आज्ञेने दूर डोंगरात, दुर्गम भागात एक आश्रम बनवला होता.
शिष्याने आश्रमाची उभारणी केली आणि गुरूंकडे निरोप पाठवला की आता मला एका सहायकाची गरज आहे.
ताबडतोब पाठवा.
मजल दरमजल करत काही महिन्यांनी हा निरोप त्यांना मिळाला. गुरुजी सगळ्या शिष्य भिक्षुंना गोळा करून म्हणाले, तुमच्यापैकी शंभरजण पहाडाकडे कूच करा.
शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. गुरू आपले जरासे तिरपागड्या डोक्याचे आहेत, पण इतके भैसाटलेले असतील, असं वाटलं नव्हतं, असा भाव काहींच्या नजरेत होता. काहींना गुर्वाज्ञा ही चिकित्सेची गोष्टच वाटत नव्हती. काहींनी गुरूंना विचारलं, शंभर कशाला? फारतर दोन पाठवा, चार पाठवा. शंभर जास्त होतील.
गुरू म्हणाले, नाही. शंभरजण निघतील.
शंभरजण निघाले.
दोन दिवसांच्या प्रवासानंतर ते ज्या गावात पोहोचले तिथल्या राजाचं निधन झालं होतं. राजपुत्राचा राज्याभिषेक करायचा होता. शंभर भिक्षुंची गरज होती. दहाच गोळा झाले होते. आणखी नव्वद ताबडतोब हवे होते. राज्याभिषेकातल्या सहभागाचा मोबदलाही भरपूर होता आणि महिन्याभरानंतर आपल्या वाटेवर निघण्याची सोयही होती. नाहीतरी गुरूंनी अनावश्यक शंभर माणसं धाडली होती.
त्यातले थोडे थांबले, उशिराने गेले, तर काहीच बिघडणार नव्हतं.
नव्वद भिक्षु मागे राहिले.
दहा पुढे चालू लागले.
आणखी दोन गावांनंतर एका ठिकाणी गावातल्या पुजाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या जागी त्यांना एक भिक्षु हवा होता. त्याला घर होतं, दक्षिणाही चांगली मिळणार होती.
आणखी एकजण मागे राहिला.
पुढे आणखी एक गळाला… मग आणखी एक…
करता करता शेवटी ९८ भिक्षु गळाले आणि दोघेच राहिले.
जिथे पोहोचायचं होतं, त्या आश्रमाच्या अलीकडच्या गावात एका नास्तिकाने या भिख्खुंना आवाहन दिलं की तुमचा धर्म म्हणजे एक थोतांड आहे. माझ्याशी शास्त्रविमर्श करून मला पटवून द्या, नाहीतर आपला धर्म खोटा आहे, हे मान्य करा.
दोघांपैकी एका भिख्खुचा राग अनावर झाला. तो म्हणाला, आश्रमात येतोच मी दोनचार दिवसांत. पण, याचं तोंड गप्प केलंच पाहिजे. आपण आव्हान नाकारून पळालो, असं कोणालाही वाटता कामा नये.
शेवटी एकजण त्या आश्रमात पोहोचला.
तिथल्या शिष्याने विचारलं, तुम्ही कितीजण निघाला होतात?
पोहोचलेला म्हणाला, शंभर.
शिष्य हसून म्हणाला, मला माहितीच होतं. शंभर निघतात, तेव्हा एखादा पोहोचतो… दहा वर्षांपूर्वी आम्हीही शंभरच निघालो होतो.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें