मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

गुरुवार, 13 अगस्त 2026

Dharm & Darshan : Mahabharat se Shiksha !!

 श्रीराम 

*खरंच कधी कधी मला असं वाटतं..*


 *महाभारतातून....*

*शिकायचं काय.....?*


नातेसंबंध खूप महत्वाचे आयुष्यात...


महाभारत संपलं. युद्ध संपलं. शंख शांत झाले. रथ थांबले. धुळ खाली बसली....!

पण एक प्रश्न अजूनही हवेत तरंगत राहिला...!

हे सगळं नेमकं कशासाठी घडलं?

राज्यासाठी? 

सत्तेसाठी? 

अहंकारासाठी? 

की नात्यांसाठी?

 जितकं महाभारत वाचत जातो, तितकं जाणवतं की महाभारत हे युद्धाचं पुस्तक नाही; ते नात्यांचं *शवविच्छेदन* आहे. 

प्रत्येक नातं फक्त उघडून दाखवत नाही तर ते आपल्याला विचारत राहतं...

तुम्ही खरंच एकमेकांवर प्रेम करत होतात का, की फक्त एकमेकांचा उपयोग करत होतात?

धृतराष्ट्राने दुर्योधनावर प्रेम केलं, पण त्या प्रेमात न्याय नव्हता. जिथे न्याय मरतो, तिथे प्रेमही फार काळ जिवंत राहत नाही.


 गांधारीने पतीच्या दुःखात सहभागी होण्यासाठी डोळ्यांवर पट्टी बांधली; पण मुलाच्या चुकीवरही तीच पट्टी कायम राहिली. कधी कधी अति निष्ठाही नातं वाचवू शकत नाही.


भीष्मांनी वचन जपलं, पण त्या एका वचनासाठी कित्येक आयुष्यांचं सुख गमावलं. नात्यांमध्ये शब्द पाळण्यापेक्षा माणूस जपणं अधिक महत्त्वाचं असतं.


द्रोणांनी अर्जुनावर प्रेम केलं, पण एकलव्याला नाकारलं. पक्षपात हा गुरूलाही लहान करून टाकतो. 


कर्णाला आयुष्यभर प्रेम हवं होतं, स्वीकार हवा होता. जिथे माणसाला स्वीकार मिळत नाही, तिथे तो चुकीच्या माणसाशीही आयुष्यभर नातं जोडतो. दुर्योधनाने कर्णाला मान दिला, म्हणून कर्ण शेवटपर्यंत त्याच्यासोबत उभा राहिला. माणूस उपकारापेक्षा स्विकाराचा जास्त ऋणी असतो.


 द्रौपदीच्या अपमानाच्या वेळी सभेत अनेक नाती बसली होती. पितामह होते, गुरू होते, राजे होते, ज्येष्ठ होते; पण कोणीच उभं राहिलं नाही. त्यादिवशी समजलं की नातं म्हणजे रक्ताचं नसतं. अन्यायाच्या वेळी जो तुमच्या बाजूला उभा राहतो, तोच आपला असतो.


 कुंतीने सत्य लपवलं आणि त्या एका सत्याच्या ओझ्याखाली कर्ण आणि अर्जुन दोघांचं आयुष्य भरडलं. नात्यांमध्ये उशिरा सांगितलेलं सत्य कधी कधी छोट्यापेक्षाही जास्त वेदना देतं.


अभिमन्यूला चक्रव्यूहात सगळ्यांनी मिळून मारलं. कारण एकटा माणूस कितीही मजबूत असला तरी तुटू शकतो. नात्यांची खरी परीक्षा एखादा माणूस एकटा पडला की सुरू होते. 


*कृष्ण सगळ्यांचा होता, पण कोणाच्याही मालकीचा नव्हता. त्याने शिकवलं की नात्यात साथ द्यायची असते, स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं नसतं.*


*तो अर्जुनाचा मित्र होता; पण त्याच्यासाठी युद्ध लढला नाही. फक्त योग्य मार्ग दाखवला.*


*खरं नातं तुमच्यासाठी निर्णय घेत नाही, तर तुम्हाला योग्य निर्णय घेण्याइतकं सक्षम करतं.*


*विदुराने सत्य सांगितलं, पण कोणी ऐकलं नाही. नात्यांमध्ये सत्य बोलणारा माणूस अनेकदा एकटा पडतो; पण शेवटी तोच सर्वात स्वच्छ राहतो.*


महाभारतात जवळजवळ प्रत्येक नातं तुटलं—वडील आणि मुलगा, भाऊ आणि भाऊ, गुरू आणि शिष्य, आई आणि मुलगा, पती आणि पत्नी, मित्र आणि मित्र. पण ही तुटलेली नाती आजही आपल्याला नाती कशी जपायची हे शिकवतात.


कारण प्रेम पुरेसं नसतं. विश्वास लागतो. 

विश्वास पुरासा नसतो. प्रामाणिकपणा लागतो. प्रामाणिकपणा पुरेसा नसतो. योग्य वेळी योग्य गोष्ट करण्याचं धैर्य लागतं. 

महाभारत सांगतं की नातं टिकवण्यासाठी नेहमी जिंकावंच लागत नाही. 

कधी स्वतःचा अहंकार हरवावा लागतो. 

कधी स्वतःचं म्हणणं सोडावं लागतं. 

कधी माफी मागावी लागते. आणि कधी... माफही करावं लागतं.

शेवटी महाभारताने एवढंच शिकवलं की रक्ताची नाती जन्म देतात; पण मनाची नाती आयुष्य देतात.

 

*ज्याला तुमच्या यशापेक्षा तुमचा अश्रू महत्त्वाचा वाटतो,*

*ज्याला तुमच्या पैशापेक्षा तुमचा हात महत्त्वाचा वाटतो,*

*ज्याला तुमच्या पदापेक्षा तुमचं मन महत्त्वाचं वाटतं,*

*त्यालाच जपा.*


कारण महाभारत संपलं, राज्य मिळालं, विजयही मिळाला; पण जे हरवलं, ते पुन्हा कोणालाच कधीच मिळालं नाही.


म्हणून शेवटी महाभारत युद्ध जिंकण्याची कथा नाही. ती नाती हरवू नयेत म्हणून वेळेत माणूस होण्याची कथा आहे.

*जय श्री. कृष्ण 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharm & Darshan : Mahabharat se Shiksha !!

 श्रीराम  *खरंच कधी कधी मला असं वाटतं..*  *महाभारतातून....* *शिकायचं काय.....?* नातेसंबंध खूप महत्वाचे आयुष्यात... महाभारत संपलं. युद्ध संपल...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!