मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

सोमवार, 24 अगस्त 2026

Pravaas !! Ek Marathi Kavita !!

 

एकटाच आलो होतो,

एकटाच जाणार आहे,

पण या दोन एकटेपणांच्या मध्ये

केवढी गर्दी भेटणार आहे!

पहिला मुक्काम, आईची कूस,

बाबांच्या बोटाचा आधार,

घर, अंगण, भावंडं

आणि मायेचा पहिला संसार.

मग शाळेची वाट धरली,

काही मित्र जीवाभावाचे झाले,

वाटलं, हेच आता कायमचे;

पण दहावीच्या वळणावर

कितीतरी चेहरे मागे राहिले.

बारावीला नवे सोबती,

कॉलेजमध्ये नवी दुनिया,

पदवी, पदव्युत्तर शिक्षण, 

प्रत्येक वळणावर नवी माणसं,

आणि प्रत्येक वेळी वाटलं,

"हीच आपली दुनिया."

नोकरी लागली.

सहकारी आले, मित्र झाले,

काहींशी मनाचे धागे जुळले.

नोकरी बदलली, शहर बदललं,

आणि नकळत

पुन्हा काही मुक्काम मागे पडले.

मग कुणीतरी आयुष्यात आलं,

हातात हात दिला,

संसार उभा राहिला.

मुलं आली, घर भरलं,

त्यांच्या हसण्यात

आपलं जग सापडलं.

आणि आपण विसरून गेलो, 

हेही प्रवासातले सुंदर मुक्काम आहेत.

मुक्काम म्हणजे नाती खोटी नाहीत,

मुक्काम म्हणजे प्रेम कमी नाही;

उलट, प्रत्येक मुक्कामाने

आपल्याला थोडं घडवलं,

थोडं बदललं,

थोडं समृद्ध केलं.

आई-वडील असोत,

मित्र असोत, शिक्षक असोत,

सहकारी, जोडीदार किंवा मुलं, 

प्रत्येकाला काही अंतर

आपल्याबरोबर चालायचं असतं.

कुणी दोन पावलं, 

कुणी दोन वर्षं,

कुणी अर्धं आयुष्य,

तर कुणी जवळजवळ शेवटपर्यंत.

पण प्रत्येकाची वाट वेगळी,

प्रत्येकाचा मुक्काम वेगळा.

आणि एक दिवस, अशीही वेळ येते,

जेव्हा गर्दी असूनही

आपली लढाई आपल्यालाच लढायची असते,

आपले निर्णय आपल्यालाच घ्यायचे असतात,

आपले अश्रू आपल्यालाच पुसायचे असतात,

आणि आपली वाट, आपल्यालाच चालायची असते.

तेव्हा कळतं, सोबत मिळणं हे भाग्य आहे,

पण सोबतीवर अवलंबून राहणं

हा प्रवासाचा नियम नाही.

आयुष्य म्हणजे, एकटेपणाची शिक्षा नाही;

ते तर स्वतःसोबत चालण्याचा

एक दीर्घ प्रवास आहे.

माणसं येतात, आपल्यावर प्रेम करतात,

आपल्याला घडवतात, आठवणी देतात

आणि त्यांच्या मुक्कामावर उतरून जातात.

आपली गाडी मात्र पुढे जाते.

कारण, या जगात येताना,  

एकटाच आलो होतो,

अनेकांच्या सोबतीने जगलो;

आणि जेव्हा निघायची वेळ येईल,

तेव्हा पुन्हा एकटाच निघेन, 

पण या वेळी रिकामा नाही,

असंख्य माणसांच्या आठवणी

मनात घेऊन.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Pravaas !! Ek Marathi Kavita !!

  एकटाच आलो होतो, एकटाच जाणार आहे, पण या दोन एकटेपणांच्या मध्ये केवढी गर्दी भेटणार आहे! पहिला मुक्काम, आईची कूस, बाबांच्या बोटाचा आधार, घर, ...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!