प्रतिसाद.
*मी आलो तेव्हा ती माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये बसलेली. मी दरवाजा उघडून आत येताच ती माझ्याकडे बघून गोड हसली.*
*"हॅलो डॉक्टर !"ती बोलली.*
*"हॅलो!"मी म्हटलं.*
*"डॉक्टर मला थोडं दाखवायचं होतं म्हणून आले होते."*
*"हो, बोला की... काय होतंय ?"*
*"माझ्या खांद्यावर कसला तरी चट्टा उठलाय."*
*"इकडं या , बघू !" मी माझ्या खुर्चीजवळच्या स्टुलकडे हात दाखवत म्हटलं.*
*"नको, तुम्हीच इकडं या .... तेच बरं पडेल." ती बोलली आणि एकदम मधाळ हसली. मला तिचं हसणं आवडलं, पण तिचं आज्ञा न पाळणं अजिबात आवडलं नाही. माझी सूचना तिनं मुकाट्यानं ऐकायला हवी होती.*
*शक्य तितकी नाराजी चेहऱ्यावर आणत मी माझ्या खुर्चीवरून उठलो, आणि तिच्या पाठीमागं जाऊन उभा राहिलो.*
*"गजकर्ण आहे!.. एक मलम ट्यूब देतो, पंधरा दिवसांत कमी होऊन जाईल." मी तिचा चट्टा पाहून पुन्हा माझ्या खुर्चीत बसत म्हटलं.*
*"चालेल, डॉक्टर!.... थॅंक यू !" ती बोलली.*
*मी प्रिस्क्रिप्शन तिच्या हातात दिलं, आणि पुढच्या पेशंटसाठी बेल दाबली. पुढचा पेशंट आला तरी ती तशीच बसून. ती आता उठून का जात नाही?*
*"डॉक्टर, मी थोडा वेळ इथं बसले तर चालेल ना ?" तिनं विचारलं.*
*"का ?"*
*"असंच!" ती पुन्हा गोड हसली.*
*पुढं तासभर ती माझ्या समोरच बसून होती. माझ्या आणि पेशंटच्या संभाषणात तीही सहभागी व्हायची. मी प्रिस्कीप्शन लिहीपर्यंत ती पेशंटबरोबर संवाद साधायची. ती एवढं लाघवी बोलायची आणि एवढं गोड हसायची की बस्स ! वाटायचं तिच्याकडं पाहतच राहावं!*
*एवढी हसतमुख कशी ही? आणि किती सकारात्मक ! येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी किती मनमोकळेपणाने बोलते? स्त्री पुरुष, लहानथोर कसला भेदभावच नाही हिच्या मनात! एका डॉक्टरसमोर बसलोय याचा दबावही नाही....*
*पण ही इथं का बसली असेल? ही सिनेमात डॉक्टरची भूमिका वगैरे तर करत नसेल ना? डॉक्टर बोलतो कसा, चालतो कसा, याचा अभ्यास करत नसेल? की डॉक्टर या विषयावर एखादी कथा वगैरे लिहीत असेल?*
*बऱ्याच वेळानं एक तरुण आत आला.*
*"काय पाहिजे?" मी त्याला विचारलं.*
*"काही नाही डॉक्टर, दीदीला न्यायला आलोय." तो बोलला.*
*"हा माझा भाऊ! " ती तरुणी बोलली, " येताना गाडीचं टायर पंक्चर झालं म्हणून पंक्चर काढायला गेला होता."*
*"हो काय?"*
*"थॅंक यू डॉक्टर ; येते आता !..... खूप छान वेळ गेला तुमच्याबरोबर !" ती बोलली.*
*तिचा भाऊ पुढं झाला. त्यानं तिच्या मानेखाली आपला डावा हात घातला. वाकून मग आपला उजवा हात तिच्या कंबरेला घातला आणि एखादया लहान मुलाला उचलून घ्यावं, तशी तिला उचलून घेतली.... मी तिच्याकडे पाहतच राहिलो.*
*ती आतापर्यंत आपल्या खुर्चीवरून का उठली नाही, त्याचं उत्तर मला मिळालं होतं. तिला मांडीपासून खाली पायच नव्हते.*
*ते दोघे गेले तरी मी अवाक होऊन तसाच उभा.*
*"सर, दोन हजार रुपयांची मोड आहे?" सिस्टरच्या बोलण्यानं मी भानावर आलो. मी सिस्टरच्या हातात कॅशबॅग दिली आणि विचारलं, "सिस्टर, तुम्ही हिला ओळखता?"*
*"मगाशीच ओळख झाली. तुम्ही यायच्या आधी आम्ही बोलत होतो तेव्हा!"*
*"हिच्या पायांना काय झालं?... की जन्मापासूनच अशी आहे?"*
*"नाही सर ! लग्न झाल्यावर नवराबायको फिरायला गेले होते, तेव्हा मोटारसायकलला अपघात झाला. ट्रक अंगावरून गेल्यामुळं नवरा जाग्यावर खलास झाला, आणि हिचे दोन्ही पाय चुरा झाले!"*
*"काय सांगता?" मी हादरलोच. एवढी हसतमुख मुलगी आणि एवढं मोठं दुःख.*
*त्यादिवशी मला कळलं की, माणसाला आनंदी राहण्यासाठी त्याच्याजवळ काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, तर माणसाचा आनंद हा तो माणूस आपल्या आतल्या आणि सभोवतालच्या वातावरणाला कसा प्रतिसाद देतो यावर अवलंबून असतो!*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें