*Combination !!*
जेवणा खाण्याचं सांगतो
एक Combination असतं,
कशाही बरोबर संगतीला घेऊन
काही खायचं नसतं.
कांदेपोह्याच्या बाजुला
सजतो फक्कड चहाच,
उपमा तिखट सांज्यावर
भुरभुरते बारीक शेवच,
साबुदाणा खिचडी खाताना
कवडी दहीच रास्त,
जेवणा खाण्याचं सांगतो
एक Combination असतं
डाळीची आमटी, गरम भात
जोडीला बटाट्याची काचरी,
वरणभात लोणकढं तूप
अन लिंबाची फोड साजरी
दोघांच्या बदलल्या जागा
की जेवणच सगळं बिनसतं,
जेवणा खाण्याचं सांगतो
एक Combination असतं,
लुसलुशीत पुरणपोळी,
सोबत वाटी दुधाची.
खुसखुशीत गुळपोळीबरोबर
साथ रवाळ तुपाची,
गोडाच्या शिऱ्याची सांजोरी
साथीला आंब्याचं लोणचं मस्त.
जेवणा खाण्याचं सांगतो
एक Combination असतं,
तिखट तिखट मिसळीसंगती
हवा बेकरी पाव,
गोडुस स्लाईस ब्रेडला,
जराही इथे ना वाव.
मिसळ-कांदा-लिंबू,
नाकातून पाणी वहातं नुसतं
जेवणा खाण्याचं सांगतो एक -
Combination असतं,
थालीपीठ भाजणीचं,
ताजं लोणी त्यावर,
असेल कातळी खोबऱ्यांची
मग कसा घालावा जिभेला आवर.
पंचपकवान्नही यापुढे
अगदी मिळमिळीत भासतं,
जेवणा खाण्याचं सांगतो
एक Combination असतं,
भाकरी ज्वारीची टम्म,
येऊन ताटात पडते,
लसणाची चटणी
भुकेला सणसणून चाळवते.
झणझणीत झुणका साथीला
शरीर होतं सुस्त,
जेवणा खाण्याचं सांगतो
एक Combination असतं,
आमरसाचा टोप,
रसभरली वाटी ताटात,
डब्यात चवड पोळ्यांची,
सटासट पोटी उतरतात.
या दोघांच्या जोडीला मात्र
कुणीच लागत नसतं,
जेवणा खाण्याचं सांगतो
एक Combination असतं,
कशाहीबरोबर संगतीला घेऊन
काही खायचं नसतं.
चुकलं चारचौघात
सांगा किती वाईट दिसतं,
जेवणा खाण्याचं सांगतो
एक Combination असतं !!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें