पाडवा भेट.
*काल बायकोला घेऊन फिरायला निघालो होतो. उद्या पाडव्याला काय भेट द्यायची हा यक्षप्रश्न भेडसावत होताच…*
*हळूच दबकत दबकत विषय काढला..*
*बायको कमालीचा समजूतदारपणा दाखवत म्हणली "मला किनई सुई दोरा पण चालेल"…*
*मी अत्यानंद व अविश्वास ह्याच्या सीमारेषेवर असताना एकदम तिने "पी एन जी" (पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स) पाशी गाडी थांबवायचा आदेश दिला.*
*पण मला डगमगण्याचे कारण नव्हते. कारण पी.एन.जी. नी शिवणक्षेत्रात पण पदार्पण केले असल्याची माझी आशा भरभक्कम होती.*
*त्यामुळे मी शांतपणे बायकोच्या मागे चालत "शिवणविभाग" कुठे असावा ह्याचा अंदाज बांधत होतो.*
*पण हे काय.. ती एकदम कर्ण आभूषणे विभागासमोर थांबली व कौंटरवरील मावशींना "सुई दोरा" दाखवा असे फर्मान सोडले…*
*"अग, इथे कुठला सुई दोरा?" असे मी म्हणेपर्यंत त्या मावशींनी एकदम एक बॉक्स बाहेर काढला व उत्साहाने माहिती पुरवली "सकाळीच नवीन स्टॉक आलाय". त्या वाक्यानेच माझ्या धीराचा स्टॉक संपला…*
*मग त्या बॉक्स मधून दोऱ्यासारखी लोंबती साखळी असणारी व खाली डायमंडचे खडे असणारे एक एक कर्ण भूषण कानाला लावून प्रात्यक्षिके सुरू झाली.*
*ह्या प्रकारच्या कर्णभूषणांना "सुईदोरा" म्हणतात हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मला काही सहस्त्र रुपये मोजावे लागणार होते, हे ज्ञान मला तत्क्षणी प्राप्त झाले…*
*आणि...*
*"माझ्या कानाला कोणते खडे म्याच होतात ते सांगा.." असा खडा सवाल दर दोन मिनिटांनी विचारला जाऊ लागल्याने, एखाद्या गोष्टीबाबत दक्ष राहणे ह्याला "कानाला खडा लावणे" असे का म्हणतात , ते मला उमगले.*
*असो..., तर तास दीड तासाच्या त्या कवायतीनंतर सर्वांच्या नशीबाने एक सेट पसंत पडला. आणि सुई दोऱ्याने शिवण्याऐवजी एखाद्याचा खिसा कसा कापता येतो ह्याचा स्वानुभव घेत आणि दागिन्यांना अशी फसवी नावे देऊन अजाण नवऱ्यांची मानसिक व आर्थिक फसवणूक करण्याबद्दल ज्वेलर्स पेढीकडे तीव्र निषेध नोंदवून मी दुकानाच्या पायऱ्या उतरू लागलो.*
*(एका सत्यघटनेवर आधारित)*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें