मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

शनिवार, 30 मार्च 2024

Dharm & Darshan !! A Marathi story from childhood to Today’s reference!!

 *लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट पुर्णपणे वाचा*

(खरोखर  सकारात्मकतेचे अप्रतिम उदाहरण आहे)


एक होती चिमणी आणि एक होता कावळा. 


चिमणीचं घर होत मेणाच, याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. 


एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. 


झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. 


कावळयाच घर होत शेणाच, ते गेले  पाण्यात वाहून, कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवलं, 


चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. 


पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !' 


चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते'


 थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !' 


चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला झोपवते' इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. 


पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही.


👉 *गोष्टीचा पुर्ण केलेला उत्तरार्ध -* 


      चिमणीचे सगळे काम आटोपले

ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की, 


अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. 


तिला विलक्षण अपराधी वाटलं. 


तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. 


ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.


'गेला असेल कुठेतरी... येईल परत' 


…. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. 


मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. 


चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … 


कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… 


तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं... 


अनेक दिवस उलटले ...


चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. 


मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. 


एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला... 


तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. 


तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! 


कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. 


कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 


'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?' 


कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,

- 'तुला राग नाही आला माझा?'


- का यावा? 


- मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?


- छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. 


तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती 


माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. 


माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का?


 आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का?


 म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.


- मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.


- चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. 


जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . 


मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'


चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -


*- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.*


चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे... 


पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....


आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय. 


- म्हणजे ?


- म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या ध्यानीच नसतं. 


ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात...


*त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही*


…. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो 


*…'थांब मला जरा  करिअर करु दे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब मला काम आहे ... थांब मला विश्रांती घ्यायची आहे ... थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.*


त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते लक्षात नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. 


आपण फार एकटे झालेले असतो.... !!


- आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर? 


मला कोणाचीच  गरज नाही हा अहंपणा बाळगु नका 


- वेळीच *'टकटक'* ऐकायला शिका.

वेळ प्रत्येकाची येते।।.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharm & Darshan !! Datta Mandir , Indore !!

 यह चित्र इंदौर के प्राचीन दत्त मंदिर का है इस मंदिर से शिवाजी और उनके गुरु रामदास जी का भी संबंध रहा है। यह मंदिर संजय सेतु के नजदीक है। इं...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!