Saujanya !!
साधारण ६-७ वर्षांपूर्वीची घटना आहे. रात्री ९ वाजता जेवताना मला एक फोन आला. मी घरून काम करत असल्याने व फ्रीलान्स वेब डिझाइनर असल्याने क्लायंट चा कधीही फोन आला तरी मी उचलतो. एकदा तर रात्री १ वाजता एका नवीन क्लायंट ने फोन केला होता व स्वतःच्या मनातील कल्पना मला सांगत होता. जाहिरात क्षेत्रात बरीच वर्षे घालवल्याने ग्राहक देवो भव या उक्तीचे महत्व मी पुरेपूर ओळखून आहे. तेव्हा हा फोन मी न कुरकुरता जेवतानाच घेतला. "मी जोशी बोलतोय नारायण पेठेतून". पलीकडून एक साठीचे गृहस्थ बोलत होते. "तुमची वेबसाईट मला गुगल मध्ये सापडली म्हणून फोन केला. मला एक वेबसाईट करायची होती. तुम्ही कुठल्याही प्रॉडक्ट ची वेबसाईट करता का हो?". मी म्हटलं, जर तुमचं प्रॉडक्ट नियमाप्रमाणे, कायदेशीर व नैतिक पणे विकण्यालायक असेल तर कुठल्याही प्रॉडक्ट किंवा सर्विस ची वेबसाईट करून देऊ, पण ते ऑनलाईन विकलं जाईलच याची आम्ही हमी देऊ शकत नाही. "ते विकलं जाण्याची मुळीच अपेक्षा नाही" - पलीकडून जोशी काका उद्गारले. म्हणजे ? माझा सवाल. "तुमचा मला पत्ता देता का ? मी उद्या सकाळी १० वाजता तुमच्याकडे येतो. मग आपण सविस्तर बोलू". मी त्यांना माझा आनंदनगर येथील पत्ता दिला व फोन ठेवला. फोन बंद केला तरी त्यांचं "ते विकलं जाण्याची मुळीच अपेक्षा नाही" हे वाक्य मला रात्री बराच वेळ झोप येऊ देईना.
दुसऱ्या दिवशी बरोब्बर १० वाजता माझ्या दारावरची बेल वाजली. अंदाज केल्याप्रमाणे समोर साठी कडे झुकलेले गृहस्थ होते. मी त्यांना या म्हणालो व आत बसवलं. सुरुवातीचं बोलणं, माझं introduction वगैरे झाल्यावर त्यांनी विषयाला हात घातला. "मला माझ्या आईसाठी वेबसाईट करून पाहिजे." आईसाठी ? अरे व्वा ! देऊ ना. सहज म्हणून विचारतो, काय वय आहे त्यांचं ? मी. समोर बसलेल्या गृहस्थाच्या वयाच्या अंदाजावरून त्याच्या आईच्या वयाचा अंदाज बांधून, व आता या वयात या आजीबाई वेबसाईट काढून काय विकत असाव्यात याची शंका आल्याने माझा आपला पुणेरी प्रश्न. "८९ वर्षे". जोशी उत्तरले. मी मनातल्या मनात उडालो. मला पुढे बोलू न देता म्हणाले "ज्या वयात कोणत्याही आजी बाईने घरात हरी हरी करत बसावं, त्या वयात हे नसतं काय खूळ घेतलंय असं वाटतंय ना तुम्हाला ?" त्यांचा प्रश्न. नाही, म्हणजे जरा आश्चर्य वाटतंय, पण देऊ ना आम्ही. समोरच्या क्लायंट ला खुश करणे एवढंच आम्ही जाणतो. असतात काही जणांची स्वप्नं. काय विकतात आमच्या आजीबाई ? मी विचारलं. "वाती, कापसाच्या सर्व प्रकारच्या वाती". मी जरा सावरून बसलो. "आता तुम्हाला सविस्तरच सांगतो" असं म्हणून जोशी काका उलगडायला लागले.
"लहानपणी आमची फार गरिबी. त्यात वडील अगदी लहानपणीच वारले. आम्ही तिन्ही भावंडे अगदी लहान होतो. कुटुंबाची सर्व जबाबदारी आईवर पडली. वडील गेल्यावर नातेवाईक जबाबदारी पडेल म्हणून लांबूनच चौकशी करीत. पण आई मोठी खंबीर. चार घरच्या पोळ्या लाटण्याचं काम स्वीकारलं, मधल्या वेळात पापड, कुरडया, सांडगे अश्या वस्तू बनवी व विके व संध्याकाळी तुळशीबागेतल्या राममंदिरात पुराण ऐकायला जाई. ते ऐकता ऐकता हातानं अखंड वाती वळणे चालू असे. त्या वाती तेथेच विकत असे व उरलेल्या एका दुकानात देत असे. रात्री जेवल्यावर एका टेलर चे काज बटन करण्याचे काम घरी आणून करीत असे. असा पूर्ण दिवस तिचा कामात जाई. दुपारची झोप काय असते ते त्या माउलीला ठाऊक नाही. एवढ्या कामाच्या रगाड्यात तिने आपला गाण्याचा छंद पण जोपासला होता. आठवड्यातून २ वेळा सदाशिव पेठेत एका बाईंकडे गाणे शिकायला जायची. त्याची फी ५ रुपये महिना होती. ती हिला कुठली परवडायला ? पण त्याच्यावर सुद्धा हिने इलाज शोधला. त्या बाईंना कमी दिसत असे, व त्यांना ब्लड प्रेशर चा त्रास होता म्हणून डॉक्टरनी त्यांना फिरायला सांगितले होते. पण दिसत नाही तर फिरणार कसं ? मग आमच्या आईने त्यांना रोज फिरवून आणणे व त्या बदल्यात त्यांनी हिला गाणे शिकवणे असे ठरले. एवढं सगळं करून तिने आम्हा तिघांची शिक्षणे केली. चांगले संस्कार केले. त्या वेळी ग्रॅजुएट झाल्यावर नोकऱ्या लागत असत. माझ्या एका बहिणीला तर PhD पर्यंत शिकवले. सर्वांची लग्ने केली. नातवंडे आली, पतवंडे सुद्धा आली, आता आम्ही सुखवस्तू झालोत. पण तिचे हे वाती वळण्याचे काम काही अजून पर्यंत थांबले नाही. आईला म्हणालो - आता पुरे कर. तुला काय गरज आहे आता वाती वळण्याची ? तर म्हणते तुमचं झालं रे पण तुमच्याच सारखी इतर पोरे आहेत बरीच अजून, त्यांचं कोण करणार ?" म्हणजे ? माझा अपेक्षित प्रश्न. "म्हणजे तिला आता तिच्या सारख्या विधवा व परित्यक्ता महिलांना मदत करायची आहे. मी म्हटले मग मी देतो कि तुला पैसे, तू ते दान कर त्यांना. तर तिचा स्पष्ट नकार ! तिला तिच्या कष्टातून दहा हजार रुपये उभे करून त्यांना मदत करायची आहे. आमच्या शेजारी एक IT इंजिनिअर मुलगा आहे, त्याने तिच्या डोक्यात हे वेबसाईट चे खूळ भरवले व माझ्या मागे १५ दिवसांपासून भुणभुण सुरु आहे. इंटरनेटवर ब्राउजिंग कसं करायचं हे पण तिनं त्याच्याकडून शिकून घेतलंय. दोन महिन्यां पूर्वी ती बाथरूम मध्ये पडली व पाय दुखावला. तरी कॉट वर बसून तिचे वाती वळणे अखंड चालू असते. वातींचा एवढा ढीग लावून ठेवलाय. त्या वेगवेगळ्या दुकानात देणे, पैसे गोळा करत बसणे याच्यात आम्हाला आता स्वारस्य नाही. तेव्हा तिचा असा समज आहे कि त्या वेबसाईटद्वारे विकल्या जातील. म्हणून तुमच्याकडे आलो. बोला तुमचे किती रुपये होतील ? पान आता पिकलेलं आहे. कधी गळून पडेल सांगता येत नाही. तिने आम्हाला काहीही कमी पडू दिले नाही, सर्वांची शिक्षणे केली, लग्ने लावून दिली, आता तिची ही स्व कष्टातून दहा हजार रुपये दान करण्याची एक इच्छा आम्ही पुरी करू शकलो नाही तर आमचा उपयोग काय?"
We ही सर्व कथा ऐकून मला त्यांना काय सांगावे कळेना. पण वेबसाईट बनवून सुद्धा तिला रिस्पॉन्स नाही मिळाला व वाती विकल्या गेल्या नाहीत तर ? माझी शंका. एकतर product असं odd जे सहजा सहजी कोणी ऑनलाईन शोधत नाही, व फक्त वेबसाईट बनवून त्याचा उपयोग नसतो, त्याच्याबरोबर मार्केटिंग, SEO ची पण गरज असते. त्याला वेळ लागू शकतो. मी हे सर्व त्यांना समजावून सांगितलं. तर त्यांचं उत्तर "अहो इथे वाती online विकल्या गेल्या पाहिजेत असं कोण म्हणालं तुम्हाला ? तुम्ही फक्त वेबसाईट बनवा. ती पूर्ण झाल्यावर एके दिवशी आम्ही एक घरगुती कार्यक्रम करून तिच्या हस्ते उदघाटन करणार आहोत. व वर्षभरात तिला वाती विकल्या जात आहेत, ऑर्डर्स येत आहेत असं दर्शवून दहा हजार रुपये तिच्या हस्ते एका विधवांसाठी काम करणाऱ्या संस्थेला दान करणार आहोत. ती संस्था पण आम्ही शोधून ठेवली आहे. ते जे समाधान तिला मिळेल ते पाहून आमच्या डोळ्यांचं पारणं फिटणार आहे. मग कधी पूर्ण होईल वेबसाईट ?"
त्यांची ही तिच्याविषयीची भावना ऐकून मी गहिवरून गेलो. त्यांना फक्त डोमेन रजिस्ट्रेशन व होस्टिंग चा खर्च वगळता डिझाईन पूर्णपणे मोफत करून देऊन ८ दिवसात वेबसाईट पूर्ण केली. डोमेन निवडला होता jeevansarthak.com (आता ही वेबसाईट अस्तित्वात नाही). उदघाटनाला त्यांनी मला पण बोलावलं होतं. त्या वयात आजीबाईचा दहा हजार स्व कष्टातून उभे करण्याचा निश्चय व स्वतःवरचा विश्वास केवळ शब्दातीत होता. निघताना मी त्यांच्या पाया पडलो. असाच लोकांच्या उपयोगी पड रे बाळा म्हणून तोंडभर आशीर्वाद दिला. तिथून निघताना अजूनही समाजात अशी आपल्या आईची इच्छा पूर्ण करणारे श्रावण बाळ आहेत याची जाणीव झाल्याने मनोमन सुखावलो.
Saujanya
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें