दिवाळीचा शेवटचा दिवस, म्हणजे यमद्वितीया, ज्याला आपण सर्वजण भाऊबीज म्हणतो. कर्नाटकात याला ‘सौदरा बिदिगे’, बंगालमधे ‘भाई फोटा’, संस्कतमधे ‘भगिनी हस्ता भोजना’, हिंदी प्रांतात ‘भाई दूज’, गुजरात मधे ‘भौ बीज’, नेपाळमधे ‘भाई टीका’ आणि मिथीलेला ‘यम द्वितीया’ म्हणतात.
भगवान सूर्य आणि त्याची पत्नी छाया यांची ही दोन अपत्ये यम आणि यमुना ! यमुनेची इच्छा भावाने आपल्या घरी येवून कधीतरी भोजन करावे, आणि युनेचे बंधू यमराजाचे काम तर जगावेगळे ! ज्याच्या घरी यमराज जाणार, त्याचे या पृथ्वीतलावरील आयुष्य संपणार ! ही समस्या यमुनेला देखील माहीत होती, आता हा तिढा सुटणार कसा ? यमुना दुःखी राहू लागली. कोणत्याही भावाला हे कसे सहन होणार ?
शेवटी एके दिवशी साक्षात यमराजाला देखील राहवले गेले नाही, आणि ते यमुनेला, त्याच्या बहिणीला भेटायला गेले. आपल्या भावाला बघून, यमुनेला आनंद पोटात मावेना. तिने आनंदीत होवून आगतस्वागत केले, त्याला प्रेमभराने भोजन दिले, त्याचा सत्कार केला. यमराजाने आपल्या बहिणीला प्रसन्न होवून, वर मागण्यास सांगीतले.
मोठी व हुषार माणसे आलेली संधी सोडत नाही, यमुनेला आपला भाऊ, यमराज याच्या कोणाकडच्या आगमनाचे परिणाम माहीत होते. यमुनेनी आपल्या भावाला, यमराजाला वर मागीतला, आणि त्या वराने समस्त बहिणींना त्यांच्या भावासाठी अभयदान दिले.
आजच्या दिवशी कोणता भाऊ, तिच्या बहिणीकडे गेला, आणि तिने औक्षण करून, त्याला प्रेमभरे भोजन दिले, तर त्या भावाला तुझ्यापासून भय नको, आणि दरवर्षी तू नित्य या दिवशी माझेकडे यावे.’ यमुनेनी तिच्या बंधूकडे, यमराजाकडे वर मागीतला व त्याने प्रसन्न होवून आपल्या बहिणीला दिला, आणि ते यमपुरीला निघून गेले.
अगदी स्कंदपुराणातील श्लोकच हवा असेल, तर बऱ्याच मोठ्या संवादातील एक श्लोक देतो -
प्रतिवर्षं समागच्छ भोजनार्थं तु मद्गृहे ।
अद्यसर्वे मोचनीयाःपापिनोनरकाद्यम ।
येऽद्यैवभगिनीहस्तात्करिष्यन्तिचभोजनम् ।
तेषां सौख्यं प्रदेहि त्वमेतदेव वृणोम्यहम् ॥
भावार्थ - हे यम, प्रतिवर्षी कार्तिक शुद्ध द्वितीयेस भोजनासाठी माझ्या घरी यावे, आणि त्या दिवशी नरकातील लोकांना मुक्त करावे. या दिवशी जे लोक आपल्या बहिणीच्या हातचे जेवण करतील, त्यांना सुख प्रदान करावे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें