"हे घर आपल्या लेकराचं आहे, आपलं नाही!"
"बाबा, हा ग्लास टेबलवर न ठेवता आत सिंकमध्ये ठेवा, तान्या ऑफिसमधून आली की रागवेल, तिला पसारा अजिबात चालत नाही. आणि हे तुमचं वर्तमानपत्र, पुस्तकं, चष्मा आणि औषधं पण इथून हलवा. ड्रॉइंगरूम स्वच्छ असावा लागतो. मी तान्यासाठी कॉफी बनवतो."
विपुलने आपल्या वडिलांना सांगितले आणि पुन्हा आपल्या कामात गर्क झाला.
हरीश बाबूंचं नुकतंच हृदयाचं ऑपरेशन झालं होतं. चांगल्या उपचारासाठी मुलाच्या शहरात आले होते. अजूनही औषधं चालू होती, वेळेवर घ्यावी लागायची. एवढ्यात सुरेखा बाई (पत्नी) खोलीत आल्या आणि सारं आवरायला लागल्या. काही राहून गेलं, तर सुनेला उद्या पुन्हा राग येईल म्हणून. त्यांनी स्वतःच ग्लास आत नेऊन ठेवला.
"विपुल, तुझ्या बाबांना आणि मलाही चहा टाक, खूप थंडी वाटतेय," त्यांनी कॉफी बनवत असलेल्या मुलाला सांगितलं.
"अगं आई, तुम्ही दोघांनी नुकताच चहा घेतला होता ना? पुन्हा काय चहा हवाय? थोडं नियंत्रण ठेवा, सारखं खाणं-पिणं काही चांगलं नाही!"
विपुलच्या तोंडून हे ऐकून सुरेखा बाई हादरल्या. त्यांनी तर मुलाच्या घराला आपलं घर मानून राहायला सुरुवात केली होती, पण इथे येऊन त्यांना जाणवलं, की हे त्यांचं घर नाही. आपण फक्त पाहुणे आहोत. इथे तर चहा-पाण्याचीही मोजदाद आहे. गावाकडच्या घरात जेव्हा हवं तेव्हा चहा प्यायचं, जे हवं ते खायचं, पण इथं? इथं प्रत्येक गोष्ट विचार करून बोलावी लागते.
ते गावात सुखात राहत होते, पण अचानक हरीश बाबूंची तब्येत बिघडली. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. गावात डॉक्टरांना दाखवलं पण फायदा झाला नाही. मग विपुलला कळवलं. त्याने शहरात आणायला सांगितलं, कारण गावात उपचार शक्य नव्हते.
"आई, तुझ्याकडे पप्पांच्या उपचारासाठी पैसे आहेत का? नाही तर मग तुम्ही ठरवा काय करायचं ते", विपुलने सरळसरळ विचारलं.
डोळ्यांतून अश्रू न गाळता, सुरेखा बाईंनी शेतीतून आलेले सगळे पैसे हातात ठेवले. मग कुठे उपचार सुरू झाले.
"सुरेखा, मला इथे राहायचं नाहीये, दम घुटतो इथे. हे आपलं घर नाही," हरीश बाबू म्हणाले.
"तुम्ही शांत राहा, मला ह्या डॉक्टरांच्या गोष्टी कळत नाहीत, म्हणूनच तर इथे यावं लागलं. आता जसं ठेवतात, तसं राहूया. उपचार झाले की परत जाऊ."
तान्या ऑफिसमधून आली होती – चिडचिड करणारी, सासू-सासऱ्यांची पर्वा न करणारी. तिच्यासाठी कॉफी बनवून देऊन विपुल ऑफिसच्या कामात परत गुंतला.
सुरेखा बाई डायबेटिक होत्या, त्यांना वेळेवर खाणं गरजेचं होतं. पोळ्या करणारी बाई आली नव्हती, त्यांना भूक लागली होती. सुनेच्या स्वयंपाकघरात त्या स्वतः काही करू शकत नव्हत्या.
"सुरेखा, मला माहितीये तू उपाशी आहेस, आणि आज पोळ्या करणारी पण आली नाही. चल परत जाऊया आपल्याच घरी, ह्या घरात आपली भूक, तहान, काहीच मोल नाही,"
हरीश बाबू म्हणाले.
इतक्यात सुमित तिथं आला"आम्ही पार्टीला जात आहोत, सकाळच्या पोळ्या आहेत, लोणचं काढून ठेवलंय, त्याच्याबरोबर पोळ्या खा."
"पण तुझ्या बाबांना खिचडी लागते..."
सुरेखा बाई काही बोलायच्या आत दोघं निघून गेले.
त्यानंतर त्यांनी हरीश बाबूंसाठी खिचडी बनवली आणि त्यांना जेऊ घातलं, औषधं दिली आणि स्वतः मात्र लोणचं पोळी खाल्ली. रात्री किचन आवरायचा त्यांना कंटाळा आला होता म्हणून त्या तश्याच झोपून गेल्या.
सकाळी लवकर उठून त्या किचन आवरू लागल्या पण भांड्यांच्या आवाजामुळे सुनेला जाग आली. ती तरातरा किचन मध्ये आली आणि तिला कळून चुकले की रात्री तिच्या किचन मध्ये स्वयंपाक करण्यात आला होता.
"आई, तूम्ही माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात स्वयंपाक बनवलात? किचन खराब केलं!"
सुरेखा बाईंना आत्तापर्यंत कळालं होतं की त्यांचा मुलगा आता सुनेच्या बोलण्यावर चालतो. सुनेला काही बोलावं लागत नाही, सगळं तोच बोलतो. त्यामुळे मुलाकडे सुनेची तक्रार करण्यात काही अर्थ न्हवता.
आज मात्र त्यांना राहवलं नाही. त्या रडक्या आवाजात मुलाकडे बघून बोलल्या:
"हो, माहितीये, हे तुझं घर आहे. आणि इथे तुझंच चालतं. हे वेगळं आहे की हे घर तुझ्या बाबांनी त्यांची जमीन विकून घेतलं.
या घरात आमचा काही हक्क नाही. चहा प्यायलाही विचारावं लागतं. तू लहान असताना आम्ही तुझ्यासाठी आमच्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवल्या.
तुझ्या खेळण्यांनी, गोंधळाने आमचं घर भरून जायचं. आणि आज आमचं सामान पसारा वाटतो?
आज हे तुझं घर आहे, पण आम्हाला तर तुरुंगासारखं वाटतं."
"मी तुझ्या चुलत्याला बोलावलंय, आम्ही दोघं परत आपल्या घरी जातोय. तुझा झगमगता फ्लॅट तुलाच ठेव. आम्ही तिथे सुखाने राहू, जिथे आमच्यावर कोणतीही बंधनं नाहीत."
"तुझ्या आजारी वडिलांना ग्लास उचलायला सांगताना तुला लाज कशी नाही वाटली? तू उचलू शकला असतास. पण तुझ्या बायकोच्या सेवेतून वेळ मिळाला असता तर."
विपुलच्या डोळ्यांत पश्चात्ताप आला, पण उशीर झाला होता. सुरेखा बाई आपल्या नवऱ्यासोबत गावाकडे निघून गेल्या.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें