आई भाड्याने देणे आहे.
सुनिता न्यूज पेपरच्या ऑफिस मध्ये जाहीरात विभागात काम करीत होती. नेहमीप्रमाणे आज देखील ती आलेल्या जाहीरातीची व्यवस्थीत मांडणी करून ती प्रिंटीगला पाठवण्यात बिझी होती. अचानक तिच्या टेबलजवळ साठ वर्षाच्या वयस्कर बाई येऊन उभ्या राहील्या. सुनिताचे लक्ष गेले तिने बसायला खुर्ची दिली. त्या थकल्या सारख्या व हताश दिसत होत्या, त्यांना धाप पण लागली होती. तिने लगेच त्यांना पाणी दिले. थोड थांबून त्या बोलल्या मला जाहीरात द्यायची आहे. सुनिताने विचारले कशासंदर्भात आहे. तुम्ही सांगा मी पहिल्यांदा कच्चं लिहून घेते, मग आपण फेअर करु या. त्याथोड्यावेळ घुटमळल्या, मग कसातरी आवंढा गिळत त्या म्हणाल्या, आई भाड्याने देणे आहे.
सुनिताचा हात थबकला, तिचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. अहो काकू तुम्ही हे काय वेड्यासारखं बोलताय, आई कधी कोणी भाड्यानी देत का ? काकू मात्र पुढे बोलत होत्या. सुशिक्षित, प्रेमळ मुलांचा सांभाळ करेल, अपेक्षा दोन वेळचे जेवण आणि राहायला छत, बस्स आणखी काही नको असे म्हणत काकूंनी डोळ्याला पदर लावला. पुढचे बोलणे शक्य होत नव्हते आणि अश्रूंचा ओघळ मात्र गालावरुन वाहणे थांबायचे नाव घेत नव्हते. सुनिता लगेच खुर्ची वरून उठली काकूंच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला व म्हणाली, काकू चला आपण बाहेर बसून बोलू या. काकूंना घेऊन ती बाहेर आली त्यांचा हात हातात घेऊन ती म्हणाली, मला सविस्तर सांगा इतका जगावेगळा निर्णय का घेतला तुम्ही ?
आता काकू एक ऊसासा टाकून बोलू लागल्या. माझे नाव अनुराधा जोशी, मी सोळा वर्षाची असतांनाच माझे लग्न झाले. घरात मोठे असल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्या ह्यांच्यावर होती. ह्यांची अर्धांगिनी म्हणून मी पण ती आनंदाने स्विकारली. तीन भाऊ, दोन बहीणी सर्वांचे शिक्षण, लग्न केले. मात्र लग्न होताच सर्वांनी आपआपले बिर्हाड वेगळे थाटले. खूप वाईट वाटले पण हे म्हणाले अग आपले दोन मुलं, मुलगी आहेत ना ते कधीच आपल्याला अंतर देणार नाहीत. कालांतराने शिकून सवरुन व मार्गाला लागलेले असल्याने तिघांचेही लग्न झाले, सुना, जावाई आले. खूप आंनदी होतो आम्ही. अशीच काही वर्षे आनंदात व नातवंडांच्या आग मनात लोटली. परंतु एके दिवशी ह्रदय विकाराचे निमित्य झाले आणि हे सोडून गेले.
मी स्वतःला समजाविले मी एकटी कुठे आहे. मुलं, सुना, जावाई, नातवंड माझ्या भोवती तर गोकुळ आहे. पण काळाच्या ओघात दोन्ही मुलं वेगवेगळी राहायला लागली. तरी सुध्दा मी समाधानी होते, कधी या मुलाकडे तर कधी त्या मुलाकडे राहून मी आनंदी होते. मी माझे शेवटचे दिवस अगदी आनंदात काढणार ह्या विचाराने खुष होते. पण अचानक एक दिवशी घरात मुलाची व सुनेची कुजबुज चालू होती. मी आडोशाला ऊभी राहून ऐकत होते अन् कानावर शब्द पडले. आईला कुणाकडे ठेवायचे ? माझा मुलगा समजावित होता अग राहू दे तिला आपल्याकडे, आपल्या मुलांचा सांभाळ करेल. सून लगेच म्हणाली नको त्या करीता आया ठेवते, उगाच त्यांची दुखणी-खुपणी करणे मला जमणार नाही, त्या पेक्षा त्यांना वृद्धाश्रमात पाठवा. हे ऐकून मला धक्काच बसला व पायाखालची जमीनच सरकली. मुलीला फोन केला, तिच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे तिच्या पाठिशी उभे राहीले होते मी, वाटले तिला तरी माझी कदर असेल. पण ती बोलली अग मला माझ्या नवर्याने, सासु सासर्यांनी घराबाहेर काढले तेव्हा तुझ्या मुलांनी नव्हते ठेवून घेतले मला. तू पण नेहमी माझ्या मुलापेक्षा दादांच्या मुलांकडे जास्त ओढ दाखवायची. आता कुठे मला चांगली नौकरी लागली आहे. सुखाचे चार दिवस आले आहे त्यात तुझं ओझं मला कसे झेपणार ? कारण मुलाला मी शाळेत पाठविते व निश्चिंत होऊन ऑफिसला जाते, तुला ठेवले तर ऊगीचच काळजीत दिवस जाईल. अगं जगू दे मनासारखं आता तरी, तुला कसे ठेऊ ? तू बघ परत प्रयत्न करुन दादाकडे राहण्याचा.
दुसर्या मुलाने तर चक्क घर लहान आहे, त्यामुळे तू राहिली तर आम्हाला privacy मिळणार नाही, असे बोलून दाखविलेे. हे सर्व ऐकलेे आणि आजपर्यत केलेल्या त्यागाचा, निस्वार्थपणाने ऊधळलेल्या प्रेमाचा पराभव झाला असे वाटले. खूप रडले आणि ठरविले आता इथे एक क्षण देखील राहायचे नाही. कुणाला तरी माझी गरज असेल एका आईची, म्हणून मी इथे आले. एव्हाना सुनिताचे डोकं तर पार सुन्न झाले होते. एका आईवर अशी वेळ यावी, तिन-तिन धडधाकटी कमावती मुलं असून देखील एका आईवर अशी जाहीरात देण्याची वेळ यावी. ती जवळ जावून, काकूंच्या मांडीवर हळूच डोकं ठेऊन म्हणाली, काकू भाड्याने राहायची तुला गरज नाही, मला मात्र तुझी गरज आहे. खरच मला आई हवी आहे, तू माझी आई होशील. मुलगी म्हणून मलाच भाड्याने घे ना, असे म्हणत सुनिता काकूंना घेवून फ्लॅटकडे निघाली चेहर्यावर एक वेगळेच समाधान घेवून.
जय श्रीराम! जय जय श्रीराम!!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें