*बहिणी*
बहिणी ह्या अश्याच असतात
हृदयाला झालेल्या जखमा लपवत
हसत असतात
डोळ्यातले अश्रू पापण्यांच्या
कडांवर थोपवत असतात
बहिणी अश्याच असतात
माहेरी झालेला अपमान
काळजात लपवून ठेवतात
माहेरचा सन्मान दिमाखात
जगाला सांगत सुटतात
बहिणी ह्या अश्याच असतात
सासरी पंचपक्कवान खातात पण
भावाच्या घरी वरणभात खाऊन
तृप्तीचा ढेकर देतात
बहिणी अश्याच असतात
हजारोचा शालू.. साड्या
कपाटात धूळ खात पडलेल्या असतात
पण भाऊबीजेच्या साडीसाठी
भावावर रुसत असतात
बहिणी ह्या अश्याच असतात
भावाच्या घरी सासुरवाडीची वर्दळ
बघून नजरेआड करतात
आपल्या वेळेलाच वहिनीला
कसं बाहेर जायचं असतं
ह्या प्रश्नाचं उत्तरचं
शोधायचं टाळतात
बहिणी अश्याच असतात
लग्नमांडव जरी भरला पाहुण्यांनी
सगळ्यांशी बोलता बोलता
हळूच रस्त्याकडे नजर मारतात
अजून भाऊ कसा आला नाही
म्हणून अस्वस्थ होतात
बहिणी अश्याच असतात
भाऊ मंडपात आला की
उत्साहात सळसळून जातात
भावाने आणलेली
काकणाची साडी नेसून
मंडपभर मिरवत राहतात
बहिणी ह्या अश्याच असतात
माहेरच्या साडीसाठी
रुसणाऱ्या बहिणी
शेवटच्या प्रवासाला निघताना
भावाचीच साडी नेसतात
बहिणी ह्या अश्याच असतात !
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें