गोडाचा_शिरा
कालपासुनच त्याचे बाबा अस्वस्थ होते. रात्रीही जरासा दूध - भात खाऊनच, निजले होते ते. त्याने बाबांना थेट नाही, पण बायकोला नी लेकीला विचारलं होतं त्याबद्दल. पण त्या दोघींनाही काहीच कारण दिसत नव्हतं, त्यांच्या अस्वस्थ असण्या मागचं. आज अक्षय तृतियेनिमित्त, घरी छान बेत होता. पुर्या, आमरस, मसाले भात, टाॅमॅटो सार, तळणात कुरडया... आणि डावीकडे होती बाबांना आवडते तशी, भाजलेल्या मिरच्या दह्यात चुरडून केलेली चटणी. एकंदरीतच अतिशय आवडीचा बेत होता हा सगळाच... बाप अन् लेकाचा. पण ताटावर बसतांनाच बाबा म्हणाले "जरासा दही - भातच खाईन". आणि बोलल्याप्रमाणेच अगदी लाडक्या नातीच्याही आग्रहाला न जुमानता, ते फक्त दही - भात खाऊनच ऊठले.
आता मात्र त्याला रहावेना... मग त्यानेही कसंबसं जेवण उरकलं, नी तो गेला बाबांच्या खोलीत. ते निजले होते, डोळ्यांवर दुमडलेला हात ठेऊन... तर दुसरा हात बाजुला ठेवला होता त्यांनी, आणि त्या हाताखाली होतं... एक कापडी गाठोडं. तो चुपचाप जाऊन बाबांच्या पायाशी बसला. त्याची चाहुल लागताच... बाबा उठून पलंगाच्या डोक्याशी आडवी उशी ठेवत, तिला टेकून बसले. तो कापडी गाठोड्यावरचा हात मात्र, तसाच ठेवला होता त्यांनी. बाबांना उठून बसलेलं बघून, लेकाने विचारलं...
"बाबा... काय झालंय?... अस्वस्थ का आहात कालपासून?"
"काही नाही रे बाळा... असं का वाटतंय तुला?"
"काल संध्याकाळ नंतरच जरा डिस्टर्ब्ड वाटताय... रात्री नुसता भात खाल्लात... आत्ता दुपारला एवढा चांगला साग्रसंगित स्वैपाक असतांनाही, फक्त दही - भात खाऊन उठलात... बरं वाटंत नाहीये का?... आणि त्या गाठोड्यात काय आहे?"
"अरे बाळा आज पहिली अक्षय तृतिया, तुझी आई गेल्यानंतरची... तिच्या दहाव्यालाच मी तुम्हाला सांगितलं होतं की... मी आंबा खाणार नाही यावर्षी, कारण तुमच्या आईला तो फार आवडायचा... काल सुनबाईने आंबे आणलेले पाहिले... आणि आजचा आमरस - पुरीचा बेतही कळला... वाईट वाटलं रे फार, की तुम्ही मला एवढ्यातच विसरलात... काल रात्री बर्याच उशिराने डोळा लागला, आणि ही आली स्वप्नात?... मला म्हणाली 'अहो ठिकेय... नातीकरता करणार असेल आमरस... तुम्ही माझ्यासाठी आंबा सोडलात ना... पण सणासुदीला घरी केलेलं गोड तुमच्या तोंडाला न लागलेलं, मलाच नाही चालणार सांगून ठेवतेय... माझ्या कपाटातल्या वरच्या खणात, माझ्या पातळात गुंडाळलेला एक डबा आहे... तो सुनबाईला द्या आता सांभाळायला... नी तिला सांगा तुमच्यापुरता तरी थोडा गोडाचा शिरा करायला'... मी सकाळी तो डबा काढला... आणि सांगणारच होतो सुनबाईला, की मी ऐकलं तिला तुला सांगताना की... 'आता आणिक काही करायला प्लिज सांगू नका हा... जे ठरलंय तेच सगळं करेपर्यंत, पिट्ट्या पडणारेय माझा'... मग मी काहीच न बोलता, परत खोलीत आणून ठेवला हा डबा".
"अहो काय हे बाबा... ते ती मला बोललेली... तुम्ही तिला काही सांगितलं असतंत करायला, तर ती अजिबातच नाही म्हणाली नसती... आणि मुळात हे आंब्याचं, आमच्या खरंच डोक्यातून गेलं होतं... पण तुम्ही सांगायचंत की हक्काने... नसता केला आमरस... त्यात काय एवढं".
बाप - लेकाचं हे बोलणं दारातून ऐकणारी ती, आणि तिची लेक आत आल्या. तिला बघताच बाबा व्यवस्थित उठून, खाली पाय सोडून बसले. ते गाठोडं आता त्यांच्या पाठी गेलं. सुन त्यांच्या जवळ गेली... आणि तिने ते गाठोडं उचलून हातात घेत, गाठ सोडली कापडाची. आत एक सुरेख नक्षीकाम असलेला, तांब्याचा गोल डबा होता... वरचं कडीचं झाकण उघडल्यावर, आत सहा त्रिकोणी खण असलेला. एका खणात पिस्ते होते... दुसर्यात काजू... तिसर्यात बदाम होते... चौथ्या खणात होती वेलची... तर पाचव्यात जायफळ... सहाव्या खणात होती एक चिठ्ठी... आणि त्या चिठ्ठीवर लिहिली होती कृती, गोडाच्या शिर्याची. त्या तिघांकडेही बघत, किंचितसं हसत बाबा बोलले...
"माझ्या आजीने हा डबा आईला दिला... आणि आईने जातांना हिला... हिला मात्र वेळच मिळाला नाही रे, हा डबा सुनबाईकडे सुपुर्द करायचा... अचानकच गेली ना ही झोपेतच... म्हणूनच हिने काल स्वप्नात येऊन, मला हा निरोप दिला असावा... ह्या डब्याचे पाचही खण, कधीच रिकामे होऊ द्यायचे नाहीत बरं का सुनबाई... 'अक्षय पात्र' आहे हे... आपल्याकडच्या भरभराटीचं प्रतिक... त्या चिठ्ठीतल्या कृतीप्रमाणेच, गोडाचा शिरा करतायत आपल्याकडे... आपल्या गेल्या तीन पिढ्या... कृती तिच ठेवायचं बंधन, अजिबातच नाही हो तुझ्यावर... पण ते खण मात्र कधी रिते होऊ देऊ नकोस बरं... आणि हा डबा तुझ्या कपाटात... आता तुझ्याच एखाद्या पातळात, गुंडाळून ठेवत जा... 'घरच्या अन्नपुर्णेच्या वस्त्राचा गंधही येतो मग शिर्याला', असं माझी आजी म्हणत असे".
तिने तो डबा मनोभावे कपाळाला लावला... हलकेसे ओठ टेकवले त्यावर... आणि बाबांकडे बघत ती म्हणाली...
"बाबा... मी ही खाल्लेली नाहीये आमरस - पुरी, तुम्ही खाल्ली नाहीत म्हणून... आता आपल्या दोघांपुरताच 'गोडाचा शिरा' करते... अगदी ह्या चिठ्ठीतल्या कृतीसारखाच... मस्त शिरा - पुरी खाऊ आपण दोघंच... या बाप - लेकीला बसुदे बघत आपल्या तोंडाकडे".
चौघेही जोरजोरात हसू लागले, तिच्या ह्या बोलण्यावर. हसता हसता एक थेंब ओघळला होता सुनेच्या डोळ्यातून, तो डबा गुंडाळलेल्या आईंच्या पातळावर... आणि भिंतीवरील आईंच्या फोटोवर अडकवलेलं चाफ्याचं फुल, गळून पडलं होतं बाबांच्या पायाशी.
सचिन श. देशपांडे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें