*मदत*
*एखाद्याला मदत करण्याची कृती आपण स्वतः करतो .. की ती आपल्या कडून करवून घेतली जाते???*
दोन्ही प्रश्नाचे उत्तर' हो' असेच असेल नाही का? तर मदतीच्या कृती बाबतचा एक किस्सा असा ....
एकदा आम्हाला सांगितले की आता पुढेचे 15 मिनिट या हॉलच्या बाहेर जा आणि कुणाला तरी मदत करून या. वेळ सुरू झाला आणि आम्ही बाहेर पडलो.
आमची मदत घेण्यासाठी कोणी दिसते का शोधू लागलो. रस्ता रहदारीचा होता. एक आजी हातात जड पिशवी घेऊन चालत होत्या. आमच्यापैकी एक जण धावतच तिथे गेला आणि अगदी विनयाने म्हणाला," आजी कुठे जायचे तुम्हाला? थोडे अंतर मी पिशवी घेतो ," त्याच्या या बोलण्यावर आजी संशयाने बाजूला झाल्या आणि चढ्या आवाजात म्हणाल्या, "बाजूला हो ....आला मोठा मदत करणारा" ... एक प्रयत्न तर फसला
वेळ आता दहाच मिनिट उरला होता. पुन्हा शोधा शोध सुरू. रस्त्याच्या कडेला मळकटलेल्या कपड्यातली एक गरीब मुलगी दिसली. आम्ही तिकडे धावलो. शेजारीच वडापावचा गाडा होता. तिला म्हणालो चल तुला वडापाव खायला देतो. त्यावर ती आमच्याकडे संशयाने पाहू लागली. नको नको म्हणत दूर पळून गेली
आता पाच मिनिटे राहिले ,शेवटी वडे तळणाऱ्या एका बाईंना आमच्या टास्क बद्दल सांगितले. आणि तुम्हाला काही मदत करू का असे विचारले. त्यावर तिनेही नकार दिला, माझे वडे बिघडवून ठेवाल असे म्हणाली. वेळ संपला आणि कुणालाही मदत न करता आम्ही परत आलो
आल्यावर सरांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर ते म्हणाले, *" आता तुमच्या लक्षात आले असेल मदत करण्यासाठी तुमची निवड व्हावी लागते. कुणी ही मदत करू शकत नाही ,मदत तीच व्यक्ती करते ज्याची परमेश्वराने निवड केलेली असते. त्यामुळे इथून पुढे आयुष्यात जर कुणाला तुमच्या माध्यमातून मदत झाली तर "मी केली" असे म्हणू नका. ती परमेश्वराने केलेली असते. पण कृतीचे माध्यम म्हणून तुम्हाला निवडले आहे हे विसरू नका. आणि त्याच्या इच्छे शिवाय हे शक्य नाही हे ध्यानात ठेवा."*
ही शिकवण त्यानंतरच्या प्रत्येक मदतीच्या कृती वेळी मला आठवत राहिली. आणि आपण फक्त माध्यम आहोत, हे सतत जाणवत राहिले.यामुळे 'अहंकाराचा वारा' काही प्रमाणात का असेना थोडा दूर रहातो हे मात्र नक्की.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें